गुजरातमधे वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांच्या हस्ते आज झालं. टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील एरोस्पेस प्रकल्प आहे. भारत आणि स्पेनदरम्यान संरक्षणक्षेत्रातले संबंध या प्रकल्पामुळे अधिक दृढ होतील त्याचप्रमाणे मेक इन इंडियालाही बळ मिळेल असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. भारत साऱ्या जगासाठी विमानं तयार करील तो दिवस फार दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संकुलात टाटा व्यतिरिक्त, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड या आस्थापना आणि खाजगी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं देखील योगदान आहे. सी २९५ जातीची ५६ विमानं देशात तयार होणार असून त्यातली ४० विमानं या प्रकल्पात तयार होणार आहेत. १६ विमानं स्पेनमधल्या एअरबस कंपनीत तयार होणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी विमानतळापासून टाटा एअरक्राफ्ट संकुलापर्यंत रोड शो केला. उभय नेत्यांमधे इतर महत्त्वाच्या विषयांवर प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा होणार आहे. हे वर्ष उभय देशांनी सांस्कृतिक पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलं आहे अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. भारताच्या विमान उद्योग क्षेत्राची दारं या प्रकल्पामुळे युरोपातल्या कंपन्यांसाठी खुली झाली असल्याची प्रतिक्रीया स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी नोंदवली.
प्रधानमंत्री मोदी आजच्या गुजरात भेटीत सुमारे चार हजार ९०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी तसंच लोकार्पण करणार आहेत. धोळकिया प्रतिष्ठान तर्फे अमरेलीमधे दुधाला इथं विकसित करण्यात आलेल्या भारत माता सरोवराचं आणि इतर पाणीपुरवठा प्रकल्पांच उद्घाटन, तसंच रस्ते, रेल्वे आणि पर्यटनविषयक प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.