डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं, प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री म्हणाले. याच उद्देशानं देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू आहे, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून गुजरातमध्ये लोथल इथं एक संग्रहालय उभारलं जात असून, नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची वा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं. या वेळी प्रधानमंत्र्यांनी गयाना, ओमान, स्लोव्हाकिया यांसारख्या देशांसह इतरत्रही स्थलांतरीत झालेल्या भारतीयांनी त्या प्रदेशांशी एकरूप होतानाही आपला भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या नोंदीकरणीसाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 

 

डिजिटल अटक या प्रकाराची तरतूद अस्तित्वात नसून हे लोकांना फसवण्याचे कारस्थान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना, ज्येष्ठ नागरिक जास्त बळी  पडतात. अशा परिस्थितीत त्यांना जागरुक करणं आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यामध्ये मदत करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. 

 

यावेळी प्रधानमंत्र्यांनी एक पेड माँ के नाम या मोहीमेच्या यशाबद्दलही श्रोत्यांना सांगितलं. या मोहिमे अंतर्गत अवघ्या पाच महिन्यात १०० कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. ही मोहीम आता जगभर पसरल्याचं ते म्हणाले. 

 

आज राष्ट्रीय छात्रसेना दिवस असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. आपणही राष्ट्रीय छात्रसेनेत होतो, त्यावेळचा आपला अनुभव स्वतः साठी अमूल्य आहे. राष्ट्रीय छात्रसेनेमुळे युवा वर्गात शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजते असं ते म्हणाले. सध्याच्या काळात राष्ट्रीय छात्र सेनेमधल्या मुलींची संख्या २५ टक्क्यावरून वाढून ४० टक्क्यापर्यंत पोहचली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्वाची असणार आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. जेव्हा युवा मनं एकत्र येऊन, देशाच्या भावी वाटचालीबद्दल विचारमंथन करतात तेव्हा त्यातून दिशा दाखवणारे ठोस मार्ग निघतात असं ते म्हणाले. हेच लक्षात घेऊन येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या असलेल्या युवा दिनाच्या निमित्तानं दिल्लीत ११ आणि १२ जानेवारी रोजी दिल्लीत भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमाअंतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. या मेळाव्यात देशाच्या तळागाळातून निवडलेले दोन हजार तरुण – तरुणी सहभागी होणार आहेत. आपण लाल किल्ल्यावरून युवा वर्गाला राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं, त्याअनुषंगानंच या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं ते म्हणाले. जगभरातली प्रतिष्ठित तज्ञांसह आपणही या उपक्रमात सहभागी होणार आहोत, या उपक्रमातून युवा वर्गाला त्यांच्या कल्पना मांडायची संधी मिळेल तसंच त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृती आराखडाही तयार करता येईल असं म्हणत, आपण सारे मिळून देश घडवू या आणि देशाचा विकास करू या, असं आवाहन त्यांनी केलं.

 

पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगली मित्र असतात आणि ग्रंथालयं ही मैत्री घट्ट करणारी उत्तम जागा असतात. असं म्हणत देशभरात ग्रंथालयांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य नागिराकंकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. समाजाच्या सक्षमीकरणासाठी वाचनालये खूपच उपयुक्त ठरत असून, नागिराकांनीही आपलं जीवनमान बदलण्यासाठी पुस्तकांशी मैत्री वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

 

यावेळी प्रधानमंत्र्यांनी पर्यावरण, वन्य जीव संवर्धन तसंच स्वच्छतेचं महत्व आणि त्यादृष्टीनं होत असलेल्या प्रयत्नांचा पुन्हा एकदा मन की बात मध्ये उल्लेख केला.  स्वच्छतेसाठी शासकीय कार्यालयांमध्ये राबवलेल्या उपक्रमांची तसंच नागरिकांकडून सुरु असलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी श्रोत्यांना दिली. यानिमित्तानं त्यांनी अक्षरा आणि प्रकृति या मुंबईतल्या दोन मुली आपल्या सहकाऱ्यांसोबत चिंध्यांपासून फॅशनचे कपडे तयार करत असल्याचा उल्लेख करून त्यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली.  अशा प्रयत्नांमुळे देशाच्या स्वच्छता मोहिमेला चालना मिळते, आणि ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम आहे, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा