प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीचा दौरा आटोपून आज नवी दिल्लीला परतले. हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. या दौऱ्यात जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह भावी पिढीसाठी एका उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवली, असंही ते म्हणाले.
विकसनशील देशांबाबतच्या, विशेषतः आफ्रिकेच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी काल जी सेव्हन परिषदेला संबोधित करताना केलं. उर्जा, कार्बन उत्सर्जन, पर्यावरण, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा जागतिक महत्त्वाच्या विविध मुद्यांवर त्यांनी भारताची भूमिका मांडली.
या परिषदेनिमित्त जमलेल्या इतर राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात चर्चा केली. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्याबरोबरच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनिओ गुटेरस यांचीही मोदी यांनी भेट घेतली.
जी सेव्हन व्यासपीठावर महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांविषयी फलदायी संवाद झाला आणि शिखर परिषदेत सहभागी देशांसोबत भारताची भागीदारी अधिक दृढ झाली, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.