आंध्र प्रदेशात, सुमारे २ लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथून करण्यात आलं. आंध्र विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सभेला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं. ‘आजचा दिवस हा आंध्र प्रदेशासाठी महत्वाचा आहे कारण हरित ऊर्जेसाठी पुढाकार आणि पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्यासाठीचे प्रकल्प उभे राहत आहेत’, असं प्रधानमंत्री म्हणाले.
आंध्र प्रदेशच्या विकासाकरिता केंद्र सरकार वचनबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं. पूडिमढाका इथं ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प उभारला जात असून यासाठी १ लाख ८५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची देखील पायाभरणी केली याशिवाय प्रधानमंत्र्यांनी ४ हजार ५९३ कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम आणि रस्तेवृद्धी प्रकल्पाची आणि ६ हजार २८ कोटी रुपयांच्या सहा रेल्वे प्रकल्पांची देखील पायाभरणी केली. तिरुपती जिल्ह्यात इंडस्ट्रीयल पार्क सिटी, विशाखापट्टणम इथे दक्षिण किनारपट्टी रेल्वे झोन मुख्यालय तसंच बल्क ड्रग पार्क याचीही कोनशिला प्रधानमंत्रांच्या हस्ते ठेवण्यात आली. सात रेल्वे प्रकल्प आणि ३ रेल्वे मार्ग यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्राला समर्पित केले. दरम्यान, विशाखापट्टणम इथे आगमन झाल्यावर प्रधानमंत्री मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुखमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री के. पवन कल्याण यांच्यासमवेत रोड शो केला.