प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आला. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत-गयाना देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गयानाच्या स्टेट हाऊस मध्ये आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. हा दौरा म्हणजे परस्पर देशातली मैत्री अधिक दृढ करण्याच्या भारताच्या कटिबध्दतेचा पुरावा असल्याचं ते म्हणाले. भारत-गयाना मधले संबंध सामायिक इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि उभय देशांचा परस्परांवरचा विश्वास यावर आधारित असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत प्रत्येक क्षेत्रात गयाना ला बरोबरीनं साथ देण्यासाठी उत्सुक असून दोन्ही देशातले संबंध संपूर्ण सर्व विकसनशील देशांसाठी महत्वाचे असल्याचं मोदी यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं.