प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी आज द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा त्यांनी घेतला. संरक्षण, उर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात नायजेरियाबरोबरच्या भागीदारीला भारताच्या दृष्टीने महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. या चर्चेनंतर सांस्कृतिक देवाणघेवाण, सीमाशुल्क सहकार्य आणि सर्वेक्षण सहकार्य संबंधातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नायजेरियातला सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून त्याकरता मोदी यांनी तिनुबू यांचे आभार मानले. हा केवळ व्यक्तिशः आपला सन्मानच नव्हे तर सर्व भारतीयांचा सन्मान असून भारत – नायजेरिया यांच्यातल्या दृढ संबंधांचं प्रतीक असल्याची भावना प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. नायजेरियातल्या पूरसंकटात भारत २० टन मदत साहित्य पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांच्या संघटनेचं सदस्यत्व नायजेरियाला मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं.
चर्चेपूर्वी प्रधानमंत्री मोदी यांचं अबुजामधल्या अध्यक्षांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने स्वागत झालं. अबुजा विमानतळावर काल ते उतरले तेव्हा नायजेरियातला भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल, नायजेरियातल्या मराठी भाषक समुदायानं मोदी यांचे आभार मानले.
नायजेरियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री दोन दिवसांच्या ब्राझिल दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते रियो द जानिरोमधे आयोजित जी ट्वेंटी राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहतील. तसंच त्या निमित्ताने रियो मधे जमलेल्या इतर देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. ब्राझिलनंतर प्रधानमंत्री मोदी येत्या १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान गयानाला भेट देणार आहेत.