भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार व्यापार करारावर चर्चा पुढे नेण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. गेल्या महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळीच दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य, बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्याविषयी जाहीर करण्यात आलं होतं. या चर्चेचा उद्देश व्यापार मजबूत करणं, बाजारपेठेत आणखी संधी उपलब्ध करून देणं तसंच करांसारख्या शुल्कांचे अडथळे कमी करून पुरवठा साखळी वाढवणं, असा असल्याचं जयस्वाल म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ११ तारखेपासून मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही जयस्वाल यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री १२ मार्च रोजी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान, प्रधानमंत्री मॉरिशसच्या राष्ट्रपतींची तसंच प्रधानमंत्र्यांची भेट घेतील, असंही जयस्वाल म्हणाले.