डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 12, 2025 8:52 PM | PM Narendra Modi

printer

फ्रान्स दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना

फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अमेरिकेला रवाना झाले. त्यापूर्वी फ्रान्समधे मार्सेली इथं भारताच्या पहिल्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या हस्ते झालं. उभय नेत्यांनी यावेळी फ्रान्समधे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यानंतर मझार्गे युद्धस्मारकावर दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या सतराशे भारतीय सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी भारत-फ्रान्स संयुक्त प्रकल्प आंतरराष्ट्रीय प्रायोगिक औष्णिक अणुभट्टीला तसंच मार्सेली बंदराला भेट दिली. मार्सेली हे फ्रान्समधलं सर्वात मोठं बंदर असून युरोप, आफ्रिका आणि आशिया दरम्यानच्या सागरी व्यापाराचं ते प्रवेशद्वार मानलं जातं.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांनी उभय देशांदरम्यानच्या भागीदारीविषयी सविस्तर चर्चा केली. संरक्षण, अणुशक्तीचा शांतिपूर्ण वापर, तसंच अंतराळविज्ञान या विषयांचा त्यात समावेश होता, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. आपसातल्या तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं पुढचं वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून साजरं करण्यावर दोघांमधे सहमती झाली असल्याचं मिसरी यांनी सांगितलं.    

 

युरोप, पश्चिम आशिया आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातल्या भूराजकीय घडामोडींविषयी देखील त्यांच्यात चर्चा झाली. मोदी आणि मॅक्राँ एकाच विमानाने मार्सेली इथं गेले, त्या प्रवासातही दोघांमधे बातचीत झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर प्राधान्याने त्यांचं बोलणं झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा