विज्ञानानं सर्वसामान्यांचं जीवनमान सोपं करावं आणि हवामान विभाग या कसोटीवर पात्र ठरत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भारतीय हवामान विभागाच्या दीडशेव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. देशातल्या ९० टक्के जनतेला हवामान विभागाच्या सुविधांचा लाभ होतो. मागील १० दिवस आणि आगामी १० दिवसांच्या हवामानाची माहिती सामान्य नागरिकांना आता सहज मिळते, असं ते म्हणाले.
हवामानशास्त्र विभागाच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त एका विशेष नाण्याचं अनावरणही त्यांनी केलं. हवामानाचा वेध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली, वायूमंडलातल्या बदलांचा सूक्ष्म वेध घेण्याची क्षमता, अत्याधुनिक रडार आणि उपग्रह तसंच उच्च दर्जाची संगणक प्रणाली यांचा वापर यासाठी विभागाकडून मिशन मौसम हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यातून हवामानाविषयी सखोल माहिती आणि हवेचा दर्जा नोंदवता येईल आणि त्याचा भावी काळातल्या हवामान व्यवस्थापन आणि संशोधनासाठी उपयोग होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी मिशन मौसमचा प्रारंभ केला.
हवामान अंदाज, हवामान व्यवस्थापन आणि हवामानबदलाचे दुष्परिणाम कमी करणे यासंबधीचं धोरण असलेल्या IMD विजन-२०४७ चं प्रकाशनही मोदी यांनी यावेळी केलं. भारताच्या हवामान विभागाने केलेल्या प्रगतीमुळे आपत्ती व्यवस्थापन क्षमता वाढल्याचा संपूर्ण जगाला लाभ झाल्याचं त्यांनी सांगितलं. फ्लॅश फ्लड तंत्रज्ञानामुळे नेपाळ, भूतान, बांग्लादेश, श्रीलंका यासारख्या शेजारी देशांना आगामी पूरपरिस्थितीबद्दल सावध करता आलं, असं मोदी यांनी यावेळी नमूद केलं.