जनतेचा पैसा जनतेच्या, देशाच्या विकासावर खर्च व्हावा, तो प्रामाणिकपणे खर्च व्हावा, याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथं ६ हजार ७०० कोटी रुपयांच्या २३ बहुविध विकास प्रकल्पाचं उदघाटन आणि पायाभरणी करताना बोलत होते. देशातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांनी यावेळी सांगितलं. पायाभूत सुविधांमुळे नागरिकांचं जीवन सुलभ होण्यासोबतच रोजगारनिर्मिती होते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
समाजाचा विकास तेव्हाच होतो, जेव्हा महिला आणि युवा सक्षम होतात. घराणेशाहीमुळे युवा पिढीचं मोठं नुकसान होतं, असं सांगून कुठलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या १ लाख तरुणतरुणींना राजकारणात आणण्याच्या निर्णयामुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा नायनाट होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केलं. स्त्रिया सक्षम असतात तेव्हाच समाज समृद्ध होतो, याची शिकवण काशीनगरी देत असून देशातील स्त्रिया आणि काशीच्या विकासासाठी सरकारनं हाती घेतलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, पर्यटन, आरोग्य असे अनेक प्रकल्प आज काशीला लाभले आहेत. काशी आणि पूर्वांचल व्यापाराचं मोठं केंद्र व्हावं, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच उत्तर प्रदेशची पायाभूत सुविधांमुळे होत असलेली नवी ओळख मोदी यांनी यावेळी अधोरेखित केली.