तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आर. जे. शंकर नेत्र रुग्णालयाचं उदघाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या आरोग्य रणनीतीचे पाच स्तंभ त्यांनी यावेळी सांगितले. रोगापासून बचाव, वेळेवर निदान, मोफत तसंच किफायतशीर उपचार आणि औषधं, लहान शहरांमध्ये डॉक्टरांची कमतरता दूर करणं आणि गुणवत्तापूर्ण उपचार पुरवणं आणि आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा विस्तार अशा पाच स्तंभांच्या माध्यमातून घडत असलेल्या बदलाविषयी त्यांनी सांगितलं.
स्वच्छता, पोषकी आहार, लसीकरण यावर सरकार देत असलेला भर मोदी यांनी अधोरेखित केला. उपचारासाठी मुंबई-दिल्लीसारख्या मोठ्या शहरांवरचं अवलंबित्व कमी व्हावं यासाठी दशकभरात लहान शहरांमध्ये आरोग्य सुविधा वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
आर. जे. शंकर रुग्णालय अध्यात्मिकता आणि आधुनिकतेचा संगम असल्याचं कौतुक प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. गेल्या दशकभरात पूर्वांचलमध्ये आरोग्य सुविधांचा विकास झाला असून वाराणसी पूर्वांचलचं मोठं आरोग्य केंद्र बनत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमानंतर मोदी यांनी वाराणसी इथं रोड शो केला.