देशातील शेतकऱ्यांना निधी आणि सन्मान देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षं पूर्ण झाल्याबद्द्ल प्रधानमंत्र्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या योजनेतून आतापर्यंत साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले याबद्द्ल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषीक्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. शेतीसाठीचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. दुसऱ्या एका संदेशात त्यांनी देशाला शेतकऱ्यांचा अभिमान असल्याचं सांगत शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारायला सरकार वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त प्रधानमंत्री आज बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यात या योजनाचा १९वा हप्ता जारी करतील. हा कार्यक्रम देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रात दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आयोजित केला जाईल. त्यामध्ये अडीच कोटी शेतकरी प्रत्यक्ष तसंच दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित रहातील.