प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तीन हजार ८८० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते वाराणसी इथं झालं. या प्रकल्पांमध्ये वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि रस्ते जोडणी प्रकल्पांचा समावेश आहे.
वाराणसी रिंग रोड आणि सारनाथ दरम्यानचा रस्ते प्रकल्प, विद्युत क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठीचा प्रकल्प, वाराणसी विभागात जौनपूर, चंदौली आणि गाजीपूर जिल्ह्यांमध्ये एक हजार ४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन पारेषण उपकेंद्राच्या दोन वाहिन्यांचं उद्घाटन आदी कामांचा सामावेश आहे. शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालय, ३५६ ग्रामीण ग्रंथालयं आणि १०० अंगणवाडी केंद्र यासह विविध प्रकल्पांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं.
जल जीवन अभियानाअंतर्गत ३४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या १३० ग्रामीण पेयजल योजनांचे उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. आयुष्मान भारत वयवंदन योजनेच्या काही लाभार्थ्यांना या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी कार्डाचं वाटप केलं. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचं स्मरण केलं.
उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर तसंच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी आज मध्य प्रदेशात इसागढ इथल्या गुरुजी महाराज मंदिर आणि आनंदपूर धाम इथंही भेट देणार आहेत.