भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. नवी दिल्ली इथे भारत मंडपम इथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सहकार क्षेत्र म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे, असं ते म्हणाले. भारतात सहकारी संस्थांची संकल्पना ही आता चळवळ बनली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सहकारी संस्थांना बहुउद्देशीय आणि बळकट बनवण्याचा आपला प्रयत्न करणार असून त्यासाठी दोन लाख गावांमधे सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले.
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त एका विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशनही झालं. या वेळी भूतानचे दाशो शेरिंग तोबगे, फिजीचे उप प्रधानमंत्री मनोआ कामिकामिका आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या गेल्या १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही परिषद भारतात होत आहे.