भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे. गेल्या ७५ वर्षात देशापुढं जी जी आव्हानं उभी राहिली त्यावर मात करण्यासाठी संविधानानं योग्य मार्ग दाखवला. या काळात आणीबाणीसारखे प्रसंग आले, त्यांनाही संविधान सामोरं गेलं. आज जम्मू-कश्मीरमधेही संविधानाची संपूर्ण अंमलबजावणी झाली आहे, ही देखील संविधानाचीच ताकद आहे, असं ते म्हणाले. सध्या भारत मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे, आणि त्यासाठीही संविधान मार्ग दाखवत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
१६ वर्षापूर्वी आजच्या दिवशीच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. याचं स्मरण त्यांनी करुन दिलं. या हल्ल्यात जीव गमवाणाऱ्यांना त्यांनी आदरांजली वाहिली. त्याबरोबरच भारताच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याच्या देशाच्या निर्धाराचा त्यांनी पुर्नरुच्चार केला.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारतीय न्यायसंस्थेच्या २०२३-२४ या वर्षाच्या अहवालाचं प्रकाशनही केलं.
एकता, एकात्मता, आणि देशाचा विकास हा भारतीय संविधानाचा मूलभूत पाया आहे, असं केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी यावेळी सांगितलं.