डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातले तरुण कठोर परिश्रमातून राष्ट्राची सक्षमता जगाला दाखवत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त ५१ हजारांहून अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं आज मोदी यांनी नियुक्ती पत्रं वाटली, त्यानंतर ते बोलत होते.

 

अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्याचं उद्दिष्ट ‘मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं, देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी देणं हे असून यामुळे लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच, लघु उद्योजकांना चालना मिळेल त्याचबरोबर देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याचा पुनरुच्चारही प्रधानमंत्र्यांनी केला. मुंबईत येत्या १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वेव्ह्ज २०२५ परिषदेचाही उल्लेख त्यांनी केला. या परिषदेमुळे डिजिटल कंटेंट क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

१५ वा रोजगार मेळा आज देशभरातल्या  ४७ ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आज निवड आणि भरती झालेले कर्मचारी महसूल विभाग, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, रेल्वे मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय यासारखी विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये सामील होणार आहेत. 

 

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप झालं. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या कल्याणासाठी काम केलं तर देश निःसंशयपणे सुरक्षित हातात असेल आणि कोणतीही शक्ती आपल्याला विकसित भारत होण्यापासून रोखू शकत नाही, असं पियूष गोयल या कार्यक्रमात म्हणाले. आयकर विभागानं मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी २५ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रं वितरित केली. मुंबई विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त राज टंडन यावेळी उपस्थित होते. 

 

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड़्डा यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. प्रधानमंत्री मोदी यांनी या देशातल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम केलं असून दहा लाखापेक्षाही अधिक सरकारी नोकऱ्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि याचा नक्कीच फायदा या तरुण वर्गाला होईल असं मत नड्डा यांनी व्यक्त केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय रोजगार मेळावा हा नोकरी प्रदान करण्यासोबतच राष्ट्रनिर्माण करणारा मेळावा असून देशातील तरुणांना सरकारी विभागात नोकरी प्रदान करून जनतेला सर्व सेवासुविधा वेळेवर देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त डॉ. हर्षवर्धिनी बुटी यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा