जग भौतिक प्रगती करतानाच युद्ध, राष्ट्रांतर्गत संघर्ष आणि मानवी मूल्यांशी निगडीत विविध आव्हानांना तोंड देत आहोत, या आव्हांनावरील उपाय हे अद्वैत तत्वज्ञानातूनच मिळणार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी काल केलं. मध्य प्रदेशातल्या अशोकनगर इथल्या इसागढ इथं श्री आनंदपूर धाम इथं भाविकांना ते संबोधित करत होते. यावेळी मोदींनी परमहंस अद्वैत पंथाच्या मंदिरांना भेट दिली तसंच प्रमुख आध्यात्मिक नेत्याची भेट घेतली. सत्संग कार्यक्रमातही सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना, गरीब आणि वंचितांची प्रगती, सबका साथ सबका विकास हा मंत्र आणि सेवेची भावना हेच केंद्रसरकारची मार्गदर्शक मूलमंत्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. समाजातील गरीब, वंचित घटकांचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन मिशन सारख्या कल्याणकारी योजना राबवल्या जात असल्याचं ते म्हणाले. पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेचाही त्यांनी उल्लेख केला.