प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज सकाळी पोर्ट लुईस इथं पोहोचले. मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम यांनी विमान तळावर त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी तिथला भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता.
मॉरिशस हा भारताचा हिंद – महासागर क्षेत्रातला महत्त्वाचा शेजारी देश असून, त्याच्याबरोबर विविध क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी तसंच हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा आणि विकासासाठी मॉरीशसच्या नेत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचं मोदी यांनी मॉरिशसला निघताना नमूद केलं होतं.
प्रधानमंत्री मोदी उद्या होणाऱ्या मॉरिशसच्या ५७ व्या राष्ट्रीय दिवस सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. ते आज राष्ट्रपती धरम गोकुळ आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.