देशात अनेक वेळा निवडणुका होत असल्यामुळे कामाचा वेग मंदावतो, त्यामुळे ‘एक राष्ट्र एक निव़डणूक’ या संकल्पनेवर देशभरात चर्चा घडवून आणण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणांना केलं. नवी दिल्लीतल्या परेड मैदानावर आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला ते संबोधित करत होते. ‘युवा शक्ती, विकसित भारत’ अशी यंदाच्या रॅलीची संकल्पना होती. देशाच्या विकासात छात्रांच्या योगदानाचं यावेळी प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं.
गेल्या दहा वर्षांत देशातल्या तरुणांनी ५० हजारांहून अधिक स्टार्टअप सुरू केले असून ते जगातील सर्वोच्च कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत, तरुणांना येणारे अनेक अडथळे मागच्या दहा वर्षात सरकारने दूर केल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मुद्रा योजना, राष्ट्रीय शिक्षण धोरण, आणि शिष्यवृत्तीमुळे तरुणांना प्रगती करण्यास मदत झाली असंही ते म्हणाले.याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ उपस्थित होते. यावेळी आठशे छात्रांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. या कार्यक्रमात १८ मित्र देशातील १४४ छात्र सहभागी झाले होते.