यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी तूर्त टळली आहे. पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मूर्तिकार आणि पर्यावरणवाद्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.
गणेशोत्सव अवघा काही दिवसांवर आल्यामुळे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालता येणार नाही. मात्र, राज्य सरकारनं केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या २०२० च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले. त्यासोबत प्रशासनानं पीओपी बंदीचं पालन करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत, त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे आदेश राज्य सरकारसह सर्व महानगरपालिकांना न्यायालयानं दिले आहेत. गेली अनेक वर्षं पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घातली गेली आहे. मात्र, ती घोषणा कागदोपत्रीच आहे. त्यामुळे सरकारनं वेळीच धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असंही न्यायालयानं यावेळी म्हटलं.