पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्युरी अर्थात पंच म्हणून पुण्यातल्या गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंह यांची निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड होणारे सिंह हे पहिलेच भारतीय आहेत. ते नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचे पथकप्रमुख म्हणून निवड झालेले आंतरराष्ट्रीय नेमबाज पद्मश्री गगन नारंग हेदेखील ‘गन फॉर ग्लोरी’ या नेमबाजी संस्थेचे सह-संस्थापक आहेत. या संस्थेच्या इलावेनिल वेलारिव्हन आणि रमिता या दोन नेमबाज देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघात असून, महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धांमध्ये त्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पवन सिंह यानी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.