संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २३ वर्ष पूर्ण होत आहेत. १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानातून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात घुसून गोळीबार केला होता. संसदेचं रक्षण करताना वीरमरण आलेले सुरक्षा रक्षक आणि प्राण गमावलेल्यांना आज देशभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या शूरांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हुतात्मा झालेल्या सुरक्षा रक्षकांचं साहस आणि निःस्वार्थ सेवा देशाला कायमच प्रेरणा देत राहील, दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत वचनबद्ध असून दहशतवादी गटांच्या विरोधात देश नेहमीच एकत्रित लढा देईल, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
या शहीदांचं सर्वोच्च बलिदान देशाला कायम प्रेरणादायी असेल, देश सदैव त्यांचं दुर्दम्य साहस आणि निष्ठेचं कृतज्ञतेनं स्मरण करेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
यानिमित्त संसद भवनात आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी हल्ल्यात शाहिद झालेल्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.