पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई केली. तिरंदाजी मध्ये पुरुषांच्या रिकर्व ओपन स्पर्धेत हरविंदर सिंहने सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला तीरंदाज ठरला आहे. पुरुषांच्या क्लब थ्रो एफ – 51 प्रकारात धर्मवीर याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच स्पर्धेत प्रणव सुरमानं रौप्य पदक जिंकलं.
गोळाफेक एफ 46 प्रकारात सचिन खिलारीनं रौप्यपदकाची कमाई केली. सचिन हा सांगली जिल्ह्यातल्या करगणी इथला रहिवासी आहे. त्याने १६ पूर्णांक ३२ मीटर अंतरावर गोळा फेकत रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, नऊ रौप्य आणि दहा कांस्य पदकं, अशी एकूण २४ पदकं जिंकली आहेत. भारत पदक तालिकेत १३व्या स्थानावर आहे.
Site Admin | September 5, 2024 9:41 AM | Paris Paralympics | Sachin Khilari | Silver Medal