रेल्वेत टीसी म्हणून काम आणि क्रीडाक्षेत्रातली अविस्मरणीय कामगिरी, हे वर्णन ऐकून कुणाची आठवण येते? मला माहितीये, तुमच्या मनात भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचं नाव आलं असेल, बरोबर ना? आता, धोनीसोबतच आणखी एका भारतीय क्रीडापटूचं नाव या वर्णनाशी तंतोतंत जुळेल. स्वप्नील कुसळे. तो मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासक म्हणून काम करतो आहे. सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानं ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कास्यपदकाचा अचूक वेध घेतला आणि आणि भारताच्या पदकांची हॅटट्रिक साधली. भारताची ही तिन्ही कास्यपदकं नेमबाजीच्याच विविध प्रकारांची आहेत, हे विशेष. शिवाय, १९५२ची हेलसिन्की ऑलिम्पिकमध्ये आपल्या मराठी मातीतले कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी जिंकलेल्या ऐतिहासिक कास्यपदकानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूने मिळवलेलं हे दुसरं पदक आहे. चला तर मग, जाणून घेऊया स्वप्नीलच्या या स्वप्नवत प्रवासाची गोष्ट.
– अंकिता आपटे
स्वप्नीलचा जन्म ६ ऑगस्टचा १९९५चा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कांबळवाडी या छोट्याशा गावातला. त्याचे वडील शिक्षक. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड होती. इतकी, की २००८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राला लक्ष्याचा वेध घेताना पाहण्यासाठी स्वप्नीलनं चक्क त्याच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेकडेही कानाडोळा केला. आणि हीच त्याची आवड त्याच्या वडिलांनी हेरली. स्वप्नीलच्या क्रीडाक्षेत्रातल्या कारकीर्दीला सुरुवात झाली ती २००९मध्ये, त्याच्या वडिलांनी राज्य सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत त्याचं नाव नोंदवल्यानंतर. एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर स्वप्नीलला एका क्रीडाप्रकाराची निवड करावी लागली आणि त्यानं अर्थातच नेमबाजीची निवड केली. त्यानंतर त्याचं प्रशिक्षण सुरू झालं ते नाशिकमध्ये. २०१२पर्यंत नेमबाजीच्या कनिष्ठ गटात स्वप्नीलचं नाव हळूहळू चमकू लागलं. क्रीडा प्रबोधिनीमुळे त्याच्या शिक्षणाची, राहण्याची सोय झाली, पण याच क्षेत्रात पूर्णवेळ उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर खर्च भागवण्यासाठी स्वप्नीलच्या वडिलांनी कर्ज काढलं. त्यावेळी एका गोळीची किंमत होती १२० रुपये. त्यामुळे सराव करताना त्याला सांभाळून या गोळ्या वापराव्या लागायच्या. त्याच्याकडे फारशी सामुग्रीही नव्हती. नंतर, २०१३मध्ये एका स्वयंसेवी संस्थेचं लक्ष स्वप्नीलकडे गेलं आणि त्यांनी त्याला आर्थिक पाठबळ द्यायला सुरुवात केली. कालांतराने तो पुण्याला आला.
५९व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत स्वप्नीलनं गगन नारंगसारख्या दिग्गज नेमबाजालाही मागे टाकून विजेतेपदाला गवसणी घातली. गगन नारंगचा खेळ बघत त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठा झालेल्या स्वप्नीलसाठी गगनविरुद्ध उभं राहण्याचा क्षण अविस्मरणीय होता. लक्ष्याचा वेध घेताना दोन फेऱ्यांच्या मधल्या वेळेत स्वतःला शांत कसं ठेवायचं, याचे धडे गगन नारंगनं आपल्याला दिले, असं स्वप्नील सांगतो.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १ कास्यपदक, तर विश्वचषक स्पर्धेत २ सुवर्ण आणि २ रौप्यपदकं अशा महत्त्वाच्या स्पर्धांमधल्या स्वप्नीलच्या भरगच्च पदकसंग्रहात आता क्रीडाविश्वात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक कास्यपदकाची भर पडली आहे. महाराष्ट्राचा मुलगा असलेल्या स्वप्नीलनं संपूर्ण देशाची आणि विशेषतः महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावलेली आहे, यात काहीच शंका नाही.