पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र ठरला. भारताच्या स्वप्निल कुसळेनं पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात आज कास्यपदकाला गवसणी घातली. त्यानं ४५१ पूर्णांक ४ दशांश गुणांची कमाई केली. चीनच्या युकुन लिऊ यानं सुवर्ण, तर युक्रेनच्या सेरही कुलिश यांनी रौप्यपदक पटकावलं. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्निल हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. तसंच पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं कास्यपदक आहे. दुसरीकडे महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात अंजुम मौदगील आणि सिफ्त कौर या पात्रता फेरीत जाण्यात अपयशी ठरल्या.
मुष्टियुद्ध स्पर्धेत निखत जरीन हिला ५० किलो वजनी गटात सोळाव्या फेरीत चीनच्या अव्वल मानांकित वू यू हिच्याकडून पराभव पत्कारावा लागला. तर हॉकीमध्ये पात्रता फेरीत भारतीय संघाला बेल्जियमनं २-१ असं पराभूत केलं. बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यीक या जोडीने २१-१३, १४-२१,१६-२१ असं हरवलं.
भारतानं आत्तापर्यंत तीन कास्यपदकांवर नाव कोरलं आहे आणि ही तिन्ही पदकं नेमबाजीतली आहेत.