पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा शानदार समारोप समारंभ काल स्टेड दे फ्रान्स मैदानावर पार पडला. भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश आणि यंदा ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी नेमबाज मनू भाकर या सोहळ्यात भारताचे ध्वजधारक होते. एक रौप्य आणि पाच कास्य अशा एकंदर सहा पदकांसह भारत पदकतालिकेत ७१व्या स्थानावर राहिला. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत ४८व्या स्थानी होता. ४० सुवर्णपदकांसह एकंदर १२६ पदकं पटकावलेल्या अमेरिकेनं अव्वल, ९१ पदकांसह चीनने दुसरं, तर ५३ पदकांसह ऑस्ट्रेलियानं तिसरं स्थान मिळवलं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रज्वलित केलेली ऑलिम्पिक ज्योत आज या सोहळ्यात समारंभपूर्वक शांत करण्यात आली. पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद असलेल्या लॉस अँजेलिसकडे ऑलिम्पिक ध्वजही सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. या सर्वांनी पूर्ण प्रयत्न केले आणि भारताला त्यांचा अभिमान आहे, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.