डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय बॅडमिंटन विश्वातला खंदा सेनापती : लक्ष्य सेन

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताचा एकमेव शिलेदार लक्ष्य सेनचं कास्यपदक अगदी थोडक्यात हुकलं. पहिला गेम जिंकून घेतलेली आघाडी त्याला टिकवता आली नाही आणि त्याचा प्रतिस्पर्धी मलेशियाचा ली झी जिया यानं पुढचे दोन्ही गेम्स जिंकून त्याला हरवलं. लक्ष्यकडे पदकाच्या आशेने बघत असलेल्या सगळ्यांसाठीच हा धक्का होता. आणि ते साहजिकही आहे. पण, ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू हा मान लक्ष्य सेननं पटकावलाय आणि ही गोष्ट नक्कीच छोटी नाही. चला तर मग, आकाशवाणी मुंबईच्या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्ट मालिकेतल्या या पॉडकास्टमध्ये लक्ष्य सेनबद्दल गप्पा मारूया.

 

– अंकिता आपटे

 

लक्ष्य सेनचा जन्म १६ ऑगस्ट २००१चा, उत्तराखंडमधल्या अलमोरा इथला. बॅडमिंटनचं बाळकडू त्याला त्याच्या घरूनच मिळालं, असं म्हणायला हवं. त्याचे वडील. डी. के. सेन यांचं नाव देशातल्या सगळ्यात विख्यात बॅडमिंटन प्रशिक्षकांमध्ये घेतलं जातं. लक्ष्यचे आजोबाही बॅडमिंटन खेळायचे. त्याचा मोठा भाऊ चिरागही चांगला बॅडमिंटनपटू होता. एकदा, वडिलांच्या मागे लागून लक्ष्य त्यांच्यासोबत बंगळुरूला भावाची एक स्पर्धा बघायला गेला. स्पर्धेनंतर लक्ष्य वडील आणि भावासोबत माजी राष्ट्रीय चॅम्पियन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांना भेटला आणि त्यानं त्यांना सांगितलं की त्यालाही याच क्षेत्रात उतरायचं आहे. विमल कुमार यांनी त्याच्या म्हणण्याचा आदर राखला आणि त्याची ट्रायल घेतली. 

 

तो अकादमीत दाखल झाल्यानंतर त्याच्यातली प्रतिभा विमल कुमार आणि दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांनी हेरली. सुरुवातीच्या काळात एखादा सामना हरल्यानंतर लक्ष्य एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा. हळूहळू वाढतं वय आणि अनुभवानुसार आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला तो शिकत गेला.

 

२०१७मध्ये वयाच्या १५व्या वर्षी राष्ट्रीय पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारणारा लक्ष्य सेन सगळ्यात कमी वयाचा खेळाडू ठरला. गंमत अशी, की ही कामगिरी करून त्यानं आपल्याच गुरूंचा विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम प्रकाश पदुकोण यांच्या नावावर होता. पुढच्याच वर्षी त्यानं २०१८च्या युथ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलं. मिश्र सांघिक प्रकारात तर त्यानं सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुढे त्यानं २०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक, २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि २०२२च्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. तसंच २०२२मध्ये भारताला थॉमस कप मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं. २०२२ची इंडिया ओपन, २०२३ची कॅनडा ओपनही त्यानं गाजवली. या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा आला तो २०२१मध्ये.  

 

या वर्षाच्या सुरुवातीला दिग्गज बॅडमिंटनपटू व्हिक्टर ॲक्सेलसेनकडून लक्ष्य सेनला निमंत्रण आलं, दुबईतल्या ॲक्सेलसेनच्या नव्या ट्रेनिंग बेसमध्ये त्याचा स्पारिंग पार्टनर होण्याचं. मोठी कामगिरी करण्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं, हे तो व्हिक्टरकडून शिकला. या सगळ्या धड्यांसह लक्ष्य सेन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उतरला आणि अनुभवी बॅडमिंटनपटू एकामागोमाग एक स्पर्धेतून बाहेर पडत असताना त्यानं उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. देशबंधू एच. एस. प्रणॉयला त्यानं सुरुवातीच्या फेरीत थेट गेम्समध्ये हरवलं. उपांत्य फेरीच्या सामन्यात भले त्याला ॲक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला, पण या सामन्यातही दोन्ही गेम्सच्या सुरुवातीला त्यानं घेतलेली आघाडी मोठी होती. पण ॲक्सेलसेनचा अनुभव उजवा ठरला आणि लक्ष्यला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र सामन्यानंतर बोलताना व्हिक्टर ॲक्सेलसेननं आपल्या या उमद्या प्रतिस्पर्ध्याचं भरभरून कौतुक केलं आणि भाकीतही वर्तवलं, की २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेन सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असेल.

 

त्यामुळे, लक्ष्य सेनचं कास्यपदक हुकलं असलं, तरी या स्पर्धेतून त्याला मिळालेला अनुभव, त्याच्या गुरुजनांनी हेरलेल्या चुका आणि पुढच्या चार वर्षांची मेहनत नक्कीच फळाला येईल आणि २०२८च्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यचा प्रतिस्पर्धी आणि मार्गदर्शक, यंदाचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ॲक्सेलसेननं त्याच्याबद्दल वर्तवलेली भविष्यवाणी नक्की खरी ठरेल- सुवर्णपदकाचं लक्ष्य, लक्ष्य सेन नक्की घेईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा