डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये गाजलेले रौप्यपदक विजेते नेमबाज Yusuf Dikec यांच्याबद्दल…

एखाद्याला काम करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी उद्युक्त करायचं असेल, तर आपण काय म्हणतो? ‘असं खिशात हात घालून बसून कसं चालेल? ऊठ आणि कामाला लाग.’ पण, मी जर तुम्हाला सांगितलं की यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असंच, खिशात हात घालून, म्हणजे, इतक्या सहज पदक मिळवण्याचा पराक्रम काही क्रीडापटूंनी केलेला आहे आणि त्यांची ही ‘कूल स्टाइल’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये. युसुफ डिकेच आणि सवाल इलेदा तरहान ही तुर्कीएची नेमबाज जोडी गेल्या दोन-तीन दिवसांपासून इंटरनेट सेन्शेशन आणि शेकडो मीम्सचा विषय झालीये, ते त्यांच्या याच स्टाइलमुळे. या जोडीनं १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत रौप्यपदक पटकावलंय. भारताची मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनं याच प्रकारात कास्यपदकाला गवसणी घातली होती.

 

आता, युसुफ डिकेच आणि सवाल इलेदा तरहान या दोघांनी असं काय केलं, ज्यामुळे ते इतके व्हायरल होतायत? सामान्यतः नेमबाजी करताना क्रीडापटू एकाग्रतेसाठी, बाहेरून येणारा आवाज अडवण्यासाठी आणि लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी अनेक उपकरणं वापरतात. भलेमोठे इअरप्लग्स, खास तयार करून घेतलेले, एक डोळा बंद करून नेमबाजाची नजर स्थिर करणारे चष्मे, लेन्सेस किंवा तत्सम गोष्टी, टोपी इत्यादी इत्यादी. एका हातात पिस्तूल, ताठ शरीर आणि शरीराला समांतर जाणारा दुसरा हात, हे नेमबाजांचं पोश्चर आपण नेहमीच पाहतो. पण, या दोघांनीही अगदी आरामात, एक हात खिशात घालून लक्ष्याचा वेध घेतला आणि रौप्यपदक खिशातही घातलं. शिवाय, युसुफ डिकेच यांची आणखी विशेष गोष्ट अशी, की ते नेमबाजी करत असताना कोणतंही खास उपकरण त्यांनी घातल्याचं दिसत नाही. त्यांच्या टीमचा साधासा टीशर्ट आणि पँट, डोळ्यांवर नेहमीचा चष्मा आणि एक हात खिशात, अशी त्यांची अतिशय कॅज्युअल पोज नेटकऱ्यांना प्रचंडच भावली. लक्षपूर्वक पाहिलं, तर त्यांच्या कानातले पिवळे इअरप्लग्स आपल्याला दिसतात, पण तेवढंच. आणि, म्हणूनच, युसुफ डिकेच यांच्या कौतुकाच्या आणि विनोदी मीम्सचा, पोस्ट्सचा पाऊस जो सुरू झाला, तो अजूनही कोसळतोय. शिवाय, तुर्किएचं ऑलिम्पिक स्पर्धेतलं नेमबाजीतलं हे पहिलंवहिलं पदक आहे. अशाच थाटात नेमबाजी करून महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्यपदक जिंकणारी दक्षिण कोरियाची किम येजी ही नेमबाजही याच कारणामुळे काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. चीनची रायफल नेमबाज लिऊ युकुन हिनंही फक्त इअरप्लग्स घालून कालच सुवर्णवेध घेतला.

 

युसुफ डिकेच या आपल्या युनिक स्टाइलबद्दल एका मुलाखतीत म्हणतात, ‘माझी नेमबाजीची पद्धत खूप दुर्मिळ आहे. बहुतेक नेमबाज एकाच डोळ्याने नेमबाजी करतात, पण मी दोन्ही डोळ्यांनी लक्ष्याचा वेध घेतो. त्यामुळे मला या सगळ्या उपकरणांची गरज भासत नाही. उलट ती नसल्यामुळे मला हलकं वाटतं आणि मी जास्त एकाग्रतेने खेळू शकतो.’ 

 

आणि, यामागे युसुफ डिकेच यांचा दांडगा अनुभव बोलतोय. २००८ पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेतलाय आणि पदकानं त्यांना हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे, हे पदक त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे आपण नक्कीच समजू शकतो. पण, ५१ वर्षांचे युसुफ डिकेच या खेळाला मात्र चांगलेच सरावलेले आहेत, असं आपल्याला म्हणावं लागेल. जेंडरमेरी जनरल कमांड, अर्थात तुर्किएच्या कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेत मध्ये नॉन कमिशन्ड अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर २००१मध्ये त्यांनी नेमबाजीचा सराव सुरू केला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य, विश्वचषक स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कास्य, शिवाय ७ युरोपीय अजिंक्यपदं, दोन रौप्य आणि दोन कास्यपदकं त्यांच्या नावावर आहेत. २००६मध्ये सीआयएसएम मिलिटरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी ५९७ गुण मिळवून विश्वविक्रम रचला होता. त्यांची जोडीदार सवाल इलेदा तरहान हिची मात्र ही पहिलीवहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि तिचं वय आहे फक्त २४ वर्षं, म्हणजे युसुफ तिच्यापेक्षा वयानं दुपटीपेक्षाही जास्त आहेत. पण, तिचं नेमबाजीतलं यश मात्र कमी नाहीये. युरोपीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, एक कास्य, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य अशी घसघशीत पदकं तिनं पटकावलेली आहेत. 

 

आणि, वयात २७ वर्षांचं अंतर असलेल्या या अनोख्या जोडीनं बडी स्टाइल में पॅरिस ऑलिम्पिकमधलं रौप्यपदक अक्षरशः ‘खिशात’ घातलेलं आहे! या ऑलिम्पिकसाठी आपण खूप सराव केला होता, त्यामुळे पदक अपेक्षितच असल्याचं युसुफ डिकेच सांगतात. पुढच्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची आशा त्यांना आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाची आणि भारी बाब म्हणजे, ऑलिम्पिकच्या अधिकृत संकेतस्थळावरचं त्यांचं जगण्याचं तत्त्वज्ञान काय आहे, माहितीये तुम्हाला? ते म्हणतात, ‘हात खिशात घालून यश मिळवता येत नाही!’.

 

– अंकिता आपटे

सर्वाधिक वाचले

सर्व पहा