प्रिय विनेश…
ऑलिम्पिकचं पदक तुझ्या गळ्यात विसावलं असतं, तर ते पदक सुंदर झालं असतं. तू पदक गमावलेलं नाहीस विनेश, पदकाने तुला गमावलंय… काही ग्रॅम वजन जास्त भरलं म्हणून भले तुला स्पर्धेतून अपात्र ठरवलं असेल त्यांनी, पण कालच्या दिवसभरात तू दिलेला आनंद, अभिमान पदकापेक्षा कमी आहे का गं? आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी तू स्वतःच अस्सल सोनं आहेस, होतीस आणि राहशील. कुठल्या पदकाची गरजच नाही त्यासाठी.
पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानात कालच्या दिवशी तू केलेली जादुई कामगिरी अजूनही डोळ्यांत, मनात तश्शीच आहे… नायिका ठरलीस गं तू अक्षरशः! मैदानात उतरलीस काय आणि एकामागोमाग एक तीन-तीन दिग्गज, नामांकित पैलवानांना आस्मान दाखवत अंतिम फेरीत धडक मारलीस काय! जसजशी तू एकेक पाऊल पुढे टाकत होतीस, तुझ्यासोबत पुढे जात होती प्रत्येक अशी मुलगी, स्त्री, जिला समाजाच्या बुरसटलेल्या चौकटीनं रोखलंय, जिला व्यवस्थेनं नाडलंय, जिच्यावरचा अन्याय डोळ्यांआड केलाय. अशा प्रत्येकीला तू हिंमत देत गेलीस लढायची, उमेद देत गेलीस पुन्हा उभं राहण्याची, आस दिलीस जिंकण्याची. आणि विनेश, इथेच तू जिंकलीस. पदकांपेक्षाही मोठी झालीस…
विनेश, फोगाट या तुझ्या आडनावासोबतच तुला कुस्तीचा वारसा मिळाला ना गं? तुझ्या चुलत बहिणी गीता आणि बबिता आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचं मैदान गाजवलेल्या. त्यांचे वडील, तुझे काका महावीर सिंह फोगाट स्वतः विख्यात पैलवान. त्यांची कहाणी सांगणाऱ्या ‘दंगल’ फिल्मच्या शेवटी गीतानं सुवर्णपदक जिंकलं आणि देशाचा तिरंगा उंचावला जात असताना मागे राष्ट्रगीत लागलं, तेव्हा सक्ती म्हणून नाही, तर स्वयंस्फूर्तीने उभं राहिलेलं संपूर्ण थिएटर, पडद्याच्या चंदेरी प्रकाशात दिसणारे कित्येकांचे पाणावलेले डोळे आणि राष्ट्रगीत संपल्यावर थिएटरमध्ये दुमदुमलेली ‘भारत माता की जय’ची घोषणा… आठवलं तरी आजही अंगावर काटा येतो. त्याच कुटुंबाची सदस्य तू. लहान वयातच तुझ्या काकांनी, महावीर फोगाट यांनी तुझी ओळख कुस्तीच्या मातीशी करून दिली. पण तुझा संघर्ष तुला करावाच लागला, नाही का? तू कुस्ती खेळायला सुरुवात केलीस, तेव्हा तुझी चुलत बहीण गीता राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवायला लागलीही होती, पण तरीही कुस्ती हा पुरुषांचा खेळ मानणाऱ्या आणि बायकांना फक्त चूल आणि मूल यातच बांधू ठेवू पाहणाऱ्या गावकऱ्यांचा कडवा विरोध तुला सोसावा लागलाच. हे कमी होतं म्हणून की काय, तू फक्त ९ वर्षांची असताना तुझे वडील गेले. या सगळ्यात तुला आधार मिळाला, तो काकांचा. आणि तू पुढे जात राहिलीस.
कनिष्ठ गटात मैदान गाजवल्यानंतर २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घालून तू ‘विनेश फोगाट’ हे नाव मोठ्या दिमाखात झळकवलंस. ऑलिम्पिक प्रतिष्ठित मैदानात उतरण्याची तयारी करता करता पदकांच्या यादीत तू भर घालत गेलीस. इस्तंबूलमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीत उत्तम कामगिरी करून तू ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित केलंस आणि या स्पर्धेतल्या फेव्हरिट खेळाडूंपैकी एक झालीस. पण, जीव तोडून लढल्याशिवाय कोणतंही यश तुझ्या ओंजळीत घालायचं नाही, असं ठरवलं होतं बहुतेक नियतीनं, आणि त्याचा प्रत्यय रिओ ऑलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आलाच. चीनच्या सुन यानान हिच्याविरुद्ध लढत असताना तुझा उजवा गुडघा डिसलोकेट झाल्यानं तुला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागलं. त्यावेळी आसवांनी डबडबलेला तुझा चेहरा अजूनही आठवतो. शरीराला होणाऱ्या वेदना त्यात होत्याच गं, पण मनाला झालेल्या वेदना? ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं तुझं स्वप्न पहिल्यांदा तेव्हा भंगलं ना गं?
पण कोण जाणे कुठून आणि कशी तू ताकद, उमेद गोळा केलीस आणि पुन्हा उभी राहिलीस. २०१८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतलं सुवर्णपदक जिंकून तू दाखवून दिलंस, तू किती धाकड आहेस ते. पुढच्याच वर्षी तू ५३ किलो वजनी गटात खेळायचा निर्णय घेतलास आणि त्याही गटात वर्चस्व राखलंस. नूर सुलतान इथं आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक पटकावलंस आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचं स्वप्न बघायला सुरुवात केलीस. आणि विनेश, तू एकटी नव्हतीस. सगळा देश तुझ्यासोबत तेच स्वप्न पाहात होता. या स्वप्नाच्या दिशेनं तुझं पहिलं पाऊल दमदार पडलं. स्विडनच्या सोफिया मॅटसनला तू हरवलंस, पण पुढच्या फेरीत बेलारूसच्या प्रतिस्पर्ध्याकडून तुला पराभव पत्करावा लागला आणि पदकानं पुन्हा तुला हुलकावणी दिली. अर्थात, यामागचं कारण काय, हे तुलाही चांगलंच ठाऊक होतं. तू नंतर सांगितलंस, की तुझी शारीरिक, मानसिक अवस्था तेव्हा फारशी चांगली नव्हती. नंतर तुझ्या खांद्याची शस्त्रक्रियाही झाली.
आणि विनेश, २०२२मध्ये तू पुन्हा ताज्या दमानं कुस्तीच्या मॅटवर परतलीस, तीच मुळी पदकांचा धडाका लावण्यासाठी. बेलग्रेडच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक आणि बर्मिंगहॅमच्या राष्ट्रकुल स्पर्धेत तू सुवर्णपदक पटकावलंस. याच वर्षी बीबीसीनं तुला इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इअर पुरस्कारानं गौरवलं. २०२३च्या आशियाई स्पर्धेत दुखापतीमुळे तुला खेळता आलं नाही, पण ऑलिम्पिकमध्ये उतरताना तू किती सज्ज होतीस, हे कालच्या दिवसाने सगळ्यांना लख्ख दाखवून दिलं.
तुझा पहिलाच सामना झाला तो जपानची डिफेन्डिंग चॅम्पियन, अग्रमानांकित युई सुसाकी हिच्याविरुद्ध. १४ वर्षांच्या कारकीर्दीत ९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अजेय असलेली, अवघ्या ४ सामन्यांमध्ये पराभवाचा चेहरा पाहिलेली ही जपानी जायंट. सगळं होतं तिच्याकडे, लवचिकता, वेग, ताकद. पण तुझ्याकडे असलेली तडफ आणि त्वेष नव्हता. तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता तो विनेश. याच बळावर तिला हरवलंस तू. जायंट किलर ठरलीस. लगेचच पुढच्या सामन्यात तू युक्रेनच्या ओक्साना लिवाचविरुद्ध उतरलीस आणि तिलाही ७-५ असं गारद केलंस. उपांत्य फेरीचा सामना तुलनेने एकतर्फीच होता नाही का गं? आणि हा सामना जिंकून तू इतिहास घडवलास विनेश. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय पैलवान. सामना जिंकल्यानंतर मॅटवर उताणं पडून आभाळाकडे बघताना, जिंकल्याच्या आनंदात हात उंचावताना काय काय आलं असेल तुझ्या मनात, विनेश? तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सोसावी लागलेली टीका, अन्याय, द्वेष, ट्रोलिंग, शिक्के? तू गिळून टाकलेला अपमान, संताप, ढाळलेली आसवं, दाटून आलेली असहाय्यता? हे सगळं शिंगावर घेऊन तू इथपर्यंत मजल मारलीस आणि हा केवढा मोठ्ठा, अतुलनीय विजय आहे अगं…
विनेश, आम्हाला ठाऊक आहे, पदक नक्की असताना अशा प्रकारे ते हिसकावून घेतलं जाणं काय असतं, तुझं आत्ता काय होत असेल, हे आमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. तुझं दुःख आभाळाएवढं आहे आणि कुणीही कितीही काहीही सांगितलं तरी त्यावर फुंकर घातली जाणं अशक्य आहे. पण, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, विनेश… तुझ्या आत्तापर्यंतच्या आणि यापुढच्या प्रवासातून प्रेरणा घेणारी, उभी राहणारी, लढणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्यासोबत आहे… हे वादळ ओसरू दे… थोडी थांब, श्वास घे, आधी पूर्ण बरी हो… आज, या घडीला तुझी पुढची वाट जरी धूसर, काळवंडलेली दिसत असली, तरी तिच्या शेवटी प्रकाशच आहे आणि तू तिथपर्यंत पोहोचणार आहेस विनेश… नक्की पोहोचणार आहेस…
– अंकिता आपटे