विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ परीक्षेत गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.
परीक्षेप्रमाणेच जीवनशैली विषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं दिली. पर्यावरण, कौटुंबिक नातेसंबंध अशा विविध विषयांचा त्यात समावेश होता.
परीक्षेच्या ताणताणावाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात प्रधानमंत्री विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कार्यक्रमाची ही आठवी आवृत्ती असून ती ७ भागात नवीन स्वरुपात सादर होणार आहे. आतापर्यंत बंद सभागृहात किंवा प्रेक्षागृहात होणारा हा कार्यक्रम आज नवी दिल्लीच्या सुंदर नर्सरीत झाडा फुलांच्या सोबतीने झाला. देशभरातून आलेले ३६ विद्यार्थी त्यात थेट सहभागी झाले.
याखेरीज दूरस्थ पद्धतीने सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची संख्या ५ कोटीपर्यंत गेली असून ही एक चळवळ बनली आहे. परीक्षेच्या ताणावर मात करण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा फायदा झाल्याची प्रतिक्रीया अनेक विद्यार्थ्यांनी दिली आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, तसंच स्वयम्, स्वयंप्रभा आणि प्रधानमंत्री कार्यालयाच्या यू ट्यूबवरुन प्रसारित झालेला हा कार्यक्रम आज देशभरात अनेकांनी पाहिला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसमवेत हा कार्यक्रम पाहिला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते.