जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 स्पर्धा आज दुपारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानावर सुरू होईल. तीन दिवसांच्या या स्पर्धेत 250 पॅरा-अॅथलीट्स सहभागी होतील, ज्यामध्ये 145 भारतीय आणि 20 देशांतील 105 आंतरराष्ट्रीय स्पर्धक असतील. ते 90 अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेतील. यंदाची ही स्पर्धा भारतानं आतापर्यंत आयोजित केलेली सर्वांत मोठी पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धा आहे.
भारतीय पथकाचे नेतृत्व पॅरिस 2024 पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते प्रवीण कुमार, नवदीप सिंग आणि धरमबीर करतील. जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचा 12 वा हंगाम गेल्या महिन्यात दुबईत सुरू झाला आणि या जुलैमध्ये चेकियामधील ओलोमौक इथं समाप्त होईल. नवी दिल्ली स्पर्धा हा दुसरा टप्पा आहे. दुबईमध्ये पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह १४ पदकं जिंकत भारतीय संघानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे.