मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्ष इथं काल झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत लोकसेवेची पंचसुत्री जाहीर करण्यात आली. मविआची सत्ता आल्यावर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये, तसंच महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, आणि नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार रु. प्रोत्साहन, जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न, कुटुंब रक्षण अंतर्गत २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधं, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल असं यात म्हटलं आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यासह मविआ चे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी आतापर्यंत अनेक गॅरंटी दिल्या, पण त्यापैकी एकही पूर्ण केली नाही. ते साततत्यानं खोटं बोलतात. काँग्रेस पक्षानं मात्र कर्नाटकमध्ये ज्या गॅरंटी दिल्या त्या पूर्ण केल्या, असं ते म्हणाले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, भाजपानं २-३ अरबपतींची मदत करण्यासाठी महाराष्ट्रातलं मविआ चं सरकार पडलं. महाराष्ट्रातलं सरकार महिलांना पैसे देण्याची घोषणा करत आहे, पण दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅससह सर्व जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत.
महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. भ्रष्टाचार बोकाळला असून शिक्षण, आरोग्य क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले.
मोदी आणि शिंदे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवू शकले नाहीत पण मविआचे सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले जातील. आम्ही जे बोलते तेच करतो, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेत सांगितलं.