शासनाच्या रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातलं खोमारपाडा या गावानं एक आदर्श घालून दिला आहे. या गावातल्या प्राथमिक शाळेत रुजू झालेले बाबू मोरे यांनी शाळकरी मुलांच्या मदतीनं गावातल्या शेतीचा आणि पर्यायानं गावकऱ्यांच्या आयुष्याचा कायापालट केला आहे. काही काळापूर्वी साडेतीन हजार लोकवस्तीच्या या गावातली ९० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबं रोजगारासाठी स्थलांतर करत होती. याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही होत असे. हे थांबवण्यासाठी मोरे यांनी मुलांना शेतीचे धडे देऊन शाळेतच परसबाग तयार करून त्यात फुलं, फळं, भाज्या लावल्या. हळूहळू पालकांनाही याची उत्सुकता निर्माण झाल्यानंतर मोरे यांनी त्यांना विविध प्रकारची शेती करण्यासाठी प्रेरित केलं. कालांतरानं यामुळं गावातल्या ७० टक्के जणांचं स्थलांतर थांबलं आहे.
खोमारपाडा गावानं इतरांसाठी एक आदर्श निर्माण केल्यानं राज्यभरात या गावाचं प्रारूप राबवायचं राज्य सरकारनं ठरवलं आहे.