जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण सल्लागारांना आठवडाभरात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर, भारताने इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार परत बोलवण्याची घोषणा केली आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेला, 1960 चा सिंधू पाणी करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. वाघा-अटारी सीमा बंद करण्यात आली असून, सार्क व्हिसा सवलत योजना पाकिस्तानी नागरिकांसाठी रद्द करण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. भारताने पाकिस्तानविरुद्ध उचलेल्या धोरणात्मक पावलांविषयी पाकिस्तानने तिखट प्रतिक्रिया दिली आहे,
सिंधू करारातून बाहेर पडण्यासाठी भारत बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहे असं पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानला शेजारी देशाशी सलोख्याचे संबध राखायचं असल्याचं सांगत, मात्र भारताने कठोर पावलं उचललीच तर पाकिस्तान उत्तर द्यायला समर्थ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनवामधल्या दहशतवादाला भारत खतपाणी घातल असल्याचा आरोपही त्यानी केला आहे, पाकिस्तानचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनीही भारताची भूमिका चुकीची असल्याचं म्हटलं आहे.