जम्मू काश्मीरमधे पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा राज्यात सर्वत्र निषेध होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून काश्मीरमधे अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी शासन सज्ज असल्याचं म्हटलं आहे. राज्यातल्या विविध राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
मुंबईत शहर भाजपनं कांदिवली इथं भारतीय जनता पक्षानं दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं. या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रदेश काँग्रेसने आज मुंबईत दादर इथं निषेध मोर्चा काढला. पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. बीड इथं धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं.
अहिल्यानगर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. तर धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
नाशिक शहरात मनसेनं निषेध केला. तसेच अभाविपच्या वतीने अशोकस्तंभावर निदर्शनं करण्यात आली. पहलगाम हल्ल्यात मरण पावलेले दिलीप देसले यांचं मूळ गाव मालेगाव तालुक्यात झोडगे इथं असून तिथं शोककळा पसरली आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव मधे सार्वजनिक नागरी सुविधा समितीने उद्या बंदची हाक दिली आहे.
दरम्यान नाशिकमधून पर्यटनासाठी काश्मीरमधे गेलेले ६१ नागरिक सुखरूप असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलं.