या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्यात पोहोचेल.
मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं. जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे.
या हल्ल्यात जखमी झालेले राज्यातले चार पर्यटक सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असल्याचं दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्राने कळवलं आहे. तसंच, जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत ३०८ पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे. या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विशेष विमानांची सोय केली जाईल, असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. श्रीनगरहून मुंबईला उद्या दोन विमानं येणार असून यात १८२ पर्यटक येणार आहेत. यासाठी इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांची व्यवस्था झाली असून याचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. पर्यटकांच्या मदतीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज श्रीनगरला रवाना झाले.