डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यासह २ परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात २० पर्यटक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अद्याप ओळख पटवण्याचं आणि बचावकार्य सुरू असल्यामुळे मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा स्पष्ट नसल्याचं सुरक्षा दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

 

दरम्यान, या भ्याड हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी आपली शोधमोहीम तीव्र केली आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला काल पोहोचले असून त्यांनी सुरक्षा दलांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उच्च स्तरीय बैठक घेतली. आज ते नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह घटनास्थळी भेट देणार आहेत. तसंच जखमींची विचारपूस करुन ते घटनेच्या साक्षीदारांशी संवाद साधतील.

 

लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडर आज श्रीनगरला पोहोचतील आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा ते आढावा घेणार आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतात परतले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी विमानतळावरच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रधानमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल. दहशतवाद्यांचे दुष्ट मनसुबे कधीच सफल होणार नाहीत असं प्रधामंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करुन मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. हे अत्यंत घृणास्पद आणि अमानवीय कृत्य असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

 

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक केंद्रिय मंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश यादव, एलजेपी पक्षप्रमुख केंद्रिय मंत्री चिराग पासवान तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि अन्य नेत्यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

 

पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काश्मीर खोऱ्यातल्या व्यावसायिकांनी तसंच पर्यटन कंपन्यांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. काल स्थानिक नागरिकांनी या हल्ल्याच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी कँडल मार्च काढला होता.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू काश्मीरमधल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्याची आणि तिथल्या प्रशासनाच्या आपण संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशातून दिली आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही पर्यटकांवरचा हल्ला दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं म्हणत त्याचा निषेध केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिका भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे. रशिया, संयुक्त अरब अमीराती आणि इराण या देशांच्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा