पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असलेल्या लष्कर – ए – तैय्यबाच्या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण ६० लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. या दहशतवाद्यांवर प्रत्येकी वीस लाखांचं इनाम पोलिसांनी ठेवलं आहे. पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रं जारी केली आहेत.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सकाळी श्रीनगरला पोहचले. पहलगाम जवळ बैसरन इथं प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी ते भेट देण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक होईल. हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्याच्या कामाचा आणि सुरक्षा स्थितीचा आढावा ते घेतील. पहलगाम हल्ल्यानंतर नौगाव, कुपवाडा तसंच जम्मूतल्या राजौरी आणि पूंछ भागात पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं वृत्त आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल निषेधाचे पडसाद देशभरात अजूनही ठळकपणे उमटत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी उत्फूर्तपणे दहशतवादाचा निषेध करत मोर्चे काढले तर अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. दिल्लीत आज व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे.
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात केंद्रसरकारनं जाहीर केलेल्या उपाययोजनांतर्गत, विसा रद्द करण्याची तरतूद पाकिस्तानच्या हिंदू धर्मीय नागरिकांना लागू होणार नाही, असं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे.