कोलकात्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालावं, अशी विनंती करणारं पत्र देशातल्या ७० हून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांनी लिहलं आहे. अशा हिंसक कृती वैद्यकीय व्यवसायाचा पाया हादरवणाऱ्या असून महिला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्यांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराकडे तातडीनं लक्ष पुरवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. पुन्हा पुन्हा घडणाऱ्या अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टरांनी या पत्राद्वारे केली.
कोलकाता प्रकरणाच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत निवासी डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन कालही सुरू होतं. निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीनं काल संध्याकाळी दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्थानकानजीकच्या परिसरात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. या दुःखद घटनेबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं मानवी साखळी तयार करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. याप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी त्यांच्यावतीनं करण्यात आली.