भारतीय सेना ही जगातील सर्वोत्तम सेनांपैकी एक सेना आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला सेना परतवून लावू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. 15 जानेवारी रोजी पुण्यात साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर Know Your Army मेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, खासदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
भारतीय लष्कर दिनानिमित्त होणारा भव्य संचलन सोहळा यंदा 15जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे. हा सोहळा पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर होणार आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या Know Your Army या प्रदर्शनात भारतीय लष्कराची सक्षमता दर्शवण्यात आली आहे. भारतीय लष्करात वापरली जाणारी भारतीय बनावटीची अत्याधुनिक उपकरणं, पिनका रॉकेट यंत्रणा, धनुष आणि बोफोर्स तोफा, रशियन बनावटीचा टी 90 रणगाडा, चिलखती वाहनं, आकाश क्षेपणास्त्र, विविध प्रकारचे ड्रोन आदी शस्त्र सामग्री प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.