नांदेड विधानसभा मतदार संघातल्या गावामध्येही एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून, या व्हॅनचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल उपस्थित होते. जिल्ह्यात मागील निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झालं आहे, त्याठिकाणी या व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मतदार जनजागृती यात्रेचा काल प्रारंभ झाला. मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगून मतदान करण्याचं आवाहन या यात्रेतून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या ५० गावांमधून जवळपास एक लाख मतदारांपर्यंत ही यात्रा पोहोचणार आहे.
निवडणुकीमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, स्वीप कक्ष आणि दयानंद महाविद्यालयाच्या वतीने काल घेतलेल्या विशेष कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘तिचा आवाज, तिचं मत आहे मौल्यवान’ ही संकल्पना घेवून आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली.