आशुरा-ए-मुहर्रम आज देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तीभावानं पाळला जात आहे. या दिवशी प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांनी, सत्य, सत्व आणि न्याय या तत्वांसाठी करबलामध्ये हौतात्म्य पत्करलं होतं. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जातो.
यानिमित्तानं दिल्लीत जामा मशीद, हजरत निजामुद्दीन, ओखला आणि मेहरौलीसह वेगवेगळ्या ठिकाणी मोहरमच्या मिरवणुका काढल्या जात आहेत. करबला हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानाला उजाळा देणाऱ्या धार्मिक सभा सुद्धा होत आहेत. वाहतूक पोलिसांनी ताजिया मिरवणुकीबाबत वाहनचालकांसाठी वाहतूक सूचनावली जारी केली आहे. देशात इतरत्रही मोहरम चे ताबूत निघणार असून. या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.