विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या पत्रकारपरिषदेत विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. पावसाळी अधिवेशनात राज्यातल्या विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आवाज उठवतील असं ते म्हणाले. नैसर्गिक आपत्ती, कर्जाचा बोजा आणि विमा कंपन्याकडून फसवणुकीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यंना पूर्ण कर्जमुक्ती द्यावी, वीजबिलं माफ करावी, विविध परीक्षांमधल्या पेपरफुटीविरुद्ध कठोर कायदा याच अधिवेशनात करावा, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी, शक्तीपीठ मार्ग प्रकल्प रद्द करावा या मागण्या विरोधक लावून धरतील असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा, तसंच कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप त्यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या अधिवेशनात आश्वासनांचा पाऊस पडेल मात्र मतदार त्याला भुलणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी, आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.