अदानी उद्योग समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार आणि इतर मुद्यांवरून निदर्शनं करत लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. मात्र हे मुद्दे शून्य प्रहरात उपस्थित करावेत, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना सांगितलं. त्यामुळे काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुुक आणि इतर पक्षाच्या खासदारांनी गदारोळ करत सभात्याग केला.
शून्य प्रहरात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी संभल हिंसाचार प्रकरणी प्रश्न उपस्थित केला. संभल हिंसाचार हा नियोजित कट होता असा आरोप यादव यांनी केला. या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
राज्यसभेतही समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनी संभल हिंसाचारप्रकरणी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.