अदानी लाचखोरी प्रकरणी आज संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्ष नेता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह राजद, डीएमके आदी प्रमुख विरोधी पक्षांनी निदर्शनं केली या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली. विरोधी पक्षांनी संसदेत केलेला गोंधळ म्हणजे केवळ नाटक आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग आणि किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना दिली.
राज्यसभेत आज परदेशातून देशहितावर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी शून्य प्रहरात उपस्थित केला. त्यावर हा गंभीर मुद्दा असल्याचं सांगत त्यावर अधिक वेळ चर्चा करण्याची सूचना अध्यक्ष जगदीप धनखड यांनी केली. याला विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर झालेल्या गोंधळात राज्यसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली.
आज लोकसभेचं कामकाजही आधी दुपारी दोन वाजेपर्यंत, आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी अहिल्या नगर ते पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली. हे काम केवळ मेंन्टनन्स पॉईंट उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मार्गावर अनेक धार्मिक स्थळ तसेच औद्योगिक क्षेत्रे असून रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास सामान्य जनतेचा प्रवास अधिक सुकर होईल असं ते म्हणाले.
नागरी हवाई वाहतूक मंत्री किनजारापु राम मोहन नायडू यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की, देशात सध्या १५७ विमानतळं कार्यरत असून २०१४ मध्ये केवळ ७४ विमानतळंच कार्यरत होती. सरकार देशात विमानतळाच्या जाळ्याला महत्त्व देत असल्याचंही ते म्हणाले. सध्या दिवसाला पाचलाख जण देशातंर्गत प्रवास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.