कांद्याच्या निर्यातीवर किमान दर मर्यादा हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात कांद्याचे दर क्विंटल मागे ४०० ते ५०० रुपयांनी वधारले आहेत. लासलगाव बाजारात आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला. लोकसभा निवडणुकीवेळी केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली होती. मात्र, प्रति मेट्रीक टन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि
४० टक्के निर्यात शुल्क कायम ठेवल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता केंद्र सरकारनं किमान निर्यात मूल्याचे बंधन हटवत आणि निर्यातीवरील ४० टक्के निर्यात शुल्क २० टक्क्यांवर आणलं. या निर्णयानंतर लासलगाव बाजार समितीत पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.आवक झालेल्या कांद्याला किमान ३ हजार ७००, कमाल ४ हजार ७०० आणि सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाले. काल याच बाजार समितीत कांद्याला सरासरी ४२०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता.