‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी वर्षभराची आर्थिक तरतूद केलेली आहे. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून त्यांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी हस्तांतरणाची औपचारिक सुरुवात करण्यासाठी पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असंही ते म्हणाले. बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी अर्थसंकल्पातही तरतूद केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भगिनींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. या योजनेद्वारे २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय औपचारिक लाभ हस्तांतरणही आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालं. यावेळी विविध मंत्री उपस्थित होते.