‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक आता सुरु आहे. एकोणचाळीस सदस्याच्या या बैठकीत लोकसभेतले सत्तावीस तर राज्यसभेतले बारा खासदार सहभागी झाले आहेत.
वारंवार होणाऱ्या निवडणूकांमुळे व्यवस्थेवर सतत तयारीचा ताण येतो. तसंच विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यायाने शिक्षणपद्धतीवरसुद्धा ताण येतो. यामुळे एक देश एक निवडणूक ही संकल्पना राष्ट्रहिताची असल्याचं संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
बैठकीच्या पहिल्या सत्रात, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्याशी संवाद साधला जाईल. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एसएन झा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारताच्या २१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष डॉ. न्यायमूर्ती बीएस चौहान, आणि राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी बातचीत होईल.