प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यासह देशभर सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नवी दिलीत कर्तव्य पथ इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या होणार असलेल्या संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संविधान स्वीकृतीची ७५ वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात आला आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो उद्याच्या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारताच्या सशस्त्र दलांसोबत इंडोनेशियाची १६० सदस्यीय संचलन तुकडी आणि १९० सदस्यीय बँड पथक या संचलनात सहभागी होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यापूर्वी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं पुष्पहार अर्पण करतील.नंतर कर्तव्य पथावर सशस्त्र दलांसह विविध पथकांच्या शानदार संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारतील. येत्या २९ जानेवारी रोजी विजय चौक इथं होणाऱ्या बीटिंग द रिट्रीट सोहळ्याने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
दरम्यान, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात आज औपचारिक स्वागत केलं. यावेळी सुबियंतो यांना गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित करण्यात आलं. प्रधानमंत्री मोदी आणि सुबियंतो दोन्ही देशांमधले परस्पर संबंध आणि द्विपक्षीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत.
‘संविधान स्वीकृतीची ७५ वी वर्षपूर्ती आणि लोकसहभाग’ यावर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भर देण्यात आला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो उद्याच्या संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.