आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे घर, वाहन किंवा आभुषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू, तसंच मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी दुकानं, मॉल्स, घाऊक बाजारपेठा, सराफकट्टे गजबजले आहेत. याशिवाय अनेकांनी ऑनलाईन खरेदीलाही पसंती दिली आहे.
विक्रम संवत २०८१ ला आजपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, सफलता, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे. आज देशभरात गोवर्धन पूजा साजरी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मुंबईत उद्या रेल्वेच्या सर्व मार्गावर दिवसभर कोणताही मेगाब्लॉक नसल्याची माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेनं दिली आहे.